सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील इंद्रराजकला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रोफेसर प्रमोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजपूत उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आजीवन
शिक्षण व विस्तार विभागाचे समन्वयक प्रोफेसर जालिंदर अंभोरे यांनी विभागाची भूमिका, कार्यपद्धती तसेच कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमागील पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
उद्घाटक प्रो. शर्मा यांनी आपल्या भाषणात तरुणांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून नोकरी देणारे बनावे, असे प्रतिपादन केले. कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरता साध्य करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राजपूत यांनी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करून स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा निर्धार करावा, असे सांगितले.
बदलत्या काळात स्किल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. या वेळी विचार पिठावर दिनांक २३/फेब्रुवारी रोजी फेब्रुवारी चे व्याख्यान देणारे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर अशोक पवार, मराठी विभागप्रमुख अनिरुद्ध मोरे, उपप्राचार्य व्यंकटेश लांब यांची उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली बिरादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.











